Friday 16 November 2012

विम्याची ऐशी तैशी -१



विमा शब्द कोश

आरोग्य विमा हा आजकाल परवलीचा विषय झाला आहे. हा विमा उतरवणे म्हणजे सुज्ञपणा. सुजाणपणा. अशी समजूत आहे, ज्या कोणाची तशी नसेल त्यांची ती करून देण्यात येत आहे. यात विमा कंपन्यांचा सहभाग आहे, सरकारचा सहभाग आहे. तथाकथित अर्थ तज्ज्ञांचा आहे. आणि इतरही बऱ्याच सामान्य लोकांचा आहे जे स्वतःला समजूतदार आणि हुशार समजतात. या आरोग्य विम्यातून घडणाऱ्या गमती-जमती ऐकणे हा एक मनोरंजक आणि उद्बोधक खटाटोप ठरेल. आरोग्य विमा समजण्यासाठी काही नवीन शब्द समजावून घ्यावे लागतील. हा शब्दकोश थोडक्यात पाहू म्हणजे मला काय म्हणायचे आहे ते स्पष्ट व्हायला मदत होईल.

विमाधारक: हा सर्वज्ञात जुना शब्द आहे. विमा काढणाऱ्या सर्व व्यक्तींना लागू.

विमाकांक्षी: विम्यातून धनलाभाची अपेक्षा ठेवणारे, भरलेल्या हप्त्यापेक्षा सतत अधिक धनलाभ मिळेल अशा अपेक्षेत असणारे (दुर्दैवाने बहुतेक सर्वच) विमाधारक. हे विम्यातील गुंतवणुकीकडे उत्पन्नाचे साधन म्हणून बघतात. विमा उतरवल्यावर येणारे आजारपण म्हणजे यांना लॉटरी वाटते.

विमासाफल्य: वर निर्देश केल्याप्रमाणे आजारी पडून विम्यातून एकदाचा अपेक्षित आणि पुरेपूर धनलाभ झाला की मनात येणारी भावना. ही एक अशी अवर्णनीय आनंदावस्था असते की त्यात मूळ आजाराचा विसर पडावा.

विमावलम्बित्व: एखादे मोठे आजारपण होऊन एकदा का विमासाफल्य झाले की अपरिहार्यपणे विमावलम्बित्व येतेच. काढलेला विमा चालू ठेवण्यासठी पुनःपुन्हा हप्ते भरत राहण्याची गरज असणे म्हणजे ही अवस्था होय. हे न केल्यास आज आलेले विमासाफल्य पुढच्या आजारपणात विफल होण्याचा धोका असतो. यावरच तर विमा कंपनीचे व्यवहार भरभराटीला येतात.  

विमात्रस्त: विमा उतरवल्यावर प्रत्यक्ष आजारपण आले की ही अवस्था येते. यामध्ये विम्याचे पैसे मिळतील की नाही या विचाराने विमाधारक त्रस्त होतो. हे विम्यामुळे निर्माण झालेले मानसिक आजारपण आहे. हे मूळ आजारापेक्षा प्रबळ ठरू शकते. त्यामुळे मूळ आजाराकडे दुर्लक्ष होण्याचा धोका संभवतो.

विमाग्रस्त: आजारपणात विम्याचे पैसे मिळाले नाहीत तर विमात्रस्तांचे विमाग्रस्तात रूपांतर होते. ही या आजाराची अधिक निराशाजनक अवस्था होय. या अवस्थेतून मुक्ती नाही.

विमासुर: हा बकासुराच्या जवळ जाणारा शब्द आहे. त्यात काही अर्थ-साधर्म्यही आहे. हे विमासुर विम्यातून परतावा मिळविण्यात कमालीचे निष्णात असतात. बकासुर जसा बकाबका अन्न गिळत असे तसे हे लोक आजारी पडून (किंवा न पडताही) बकाबका विम्याचे पैसे मिळवितात. ही एक अवघड पण गरजेची कला आहे. प्रत्यक विमाकांक्षीचे एकमात्र ध्येय असते की आपण विमासुर व्हावे.

विमाकर्षक: विमा विकणाऱ्या कंपन्या विमा विकण्यासाठी म्हणून जी वर्तणूक करतात त्यासंबंधीचे विशेषण. या प्रकारचे काम सरकारही करते. विमाकांक्षी लोकांना प्रलोभने दाखवून त्यांना विमा उतरविण्यास भाग पाडणे आणि त्यांच्याकडून पैसे मिळविणे यासाठी या वर्तनाचा उपयोग होतो.

विमाशरण: समाजातील विमाकर्षण जसजसे काढत जाते तसतशी समाजात ही अवस्था प्रबळ होते. यामध्ये सर्व वैद्यकीय सत्यांचा विम्याच्या संदर्भात विचार होतो. आजाराचे निदान, आजाराचे उपचार, या उपचारावर येणारा खर्च हे सर्व विमा कंपनी ठरवते. वैद्यकीय पाठ्यपुस्तकांच्या जोडीने आजारांविषयी विमा कंपन्यांची कल्पना काय आहे, त्यांच्या शर्ती काय आहेत हे शिकण्याची वेळ डॉक्टरांवर येते. विमामान्य अशा आजारांना विमामान्य असे उपचार देऊ शकेल तो चांगला डॉक्टर अशी भावना सर्वसामान्य लोकांची होते. समाज विमाशरण करणे हे विमा कंपन्यांचे (आणि दुर्दैवाने सरकारचेही) ध्येय असते, कारण त्यात त्यांचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले असतात. अमेरिकेसारख्या प्रगत देशांमध्ये या अवस्थेचा परमोत्कर्ष झालेला आढळून येतो.

विमोत्सारक: विमाधारक आजारी पडला की त्याचा विमा परतावा देण्यासंबंधी जी प्रचंड टाळाटाळ विमा कंपनी करते, त्याला उद्देशून वापरले जाणारे विशेषण. या वर्तनावरच विमा कंपनीचे अस्तित्व अवलंबून असते. नाही तर विमासुर अशा कंपनीला खाऊन टाकतील असा धोका असतो.

विमाडाव: हा लपंडाव या शब्दाशी जुळणारा थोडा समानार्थी शब्द आहे. विमा व्यवसायामध्ये विमाधारक, विमा विक्रेत्या कंपन्या, विम्याचे दलाल, डॉक्टर, हॉस्पिटल एकमेकांमध्ये जो लपंडावाचा खेळ खेळत एकमेकांना फसवत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करतात त्या खेळाचे हे नाव. या खेळाचे वैशिष्ट्य असे की यात कुणाचेही मनोरंजन होत नाही आणि खेळणारे सर्व गडी वेगवेगळ्या प्रकारे हरतात. आणि हे लक्षात न येऊन ते पुन्हा पुन्हा हा खेळ खेळत राहतात. हे एक प्रकारचे वैद्यकीय जगाला अद्याप अज्ञात असलेले पण तरीही आर्थिक दृष्ट्या प्रगतिशील समाजात सर्वदूर पसरलेले असे व्यसन आहे.

विमामुक्ती: वर उल्लेखिलेल्या विमाडावाचे वास्तविक स्वरूप आकलन झाल्यावर येणारी आनंदी भावावस्था. ही जर समाजात येईल तर समाज अधिक निरोगी आनंदी होण्याची शक्यता आहे. समाजातील काही अपप्रवृत्तींचे उच्चाटन होण्यास विमामुक्तीने मदत होईल. आजच्या प्रगतीशील आणि भौतिक सुखाच्या हव्यासाने पछाडलेल्या जगतात विमामुक्त अवस्थेची कल्पना अशक्यप्राय वाटते किंबहुना ती प्रतिगामी वाटण्याचीसुद्धा शक्यता आहे. ‘कालाय तस्मै नमः’ एवढेच त्याबाबत बोलणे शक्य आहे.

विम्यासंबंधी इतपत प्रास्ताविक करून त्यासंबंधी काही मनोरंजक किस्से सांगण्याचा प्रयत्न मी पुढच्या काही लेखांमधून करणार आहे

लेख क्रमशः वाचा आणि विमानंद मिळवा!
क्रमशः पुढे चालू

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०

1 comment:

  1. नमस्कार डॉक्टरसाहेब!

    मस्त यादी आहे. तीत विमामनस्क ही संज्ञादेखील अंतर्भूत केली पाहिजे! जंगजंग पछाडूनही नवे विमाधारक मिळाले नाहीत की विम्याचा एजंट विमामनस्क होतो.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

    ReplyDelete